नागपूर : बनावट ऑनलाईन गेमींग अॅपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक करणारा बुकी सोंटू जैनने अखेर जेएमएफसी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. गोंदियातील सोंटू जैनने नागपुरातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पळून गेला होता.
सोंटूच्या घरातून १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली. तसेच जवळपास १०० कोटींची अन्य मालमत्ता जप्त केली. सोंटूने पाण्यासारखा पैसा खर्च करून अटकपूर्व जामीन मिळवला होता. मात्र, त्याचा जामीन सर्वोच्च न्यायालयातून फेटाळल्यामुळे सोंटूकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. त्यामुळे त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
डायमंड एक्स्चेंज डॉट कॉम नावाची लिंक पाठवून सोंटूने अग्रवाल यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला. या ऑनलाइन जुगाराचा सूत्रधार राकेश राजकोट ऊर्फ आरआर असून, पोलिसांनी आता त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग दिल्याची माहिती आहे. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सोंटू हा नागपुरातून पसार झाला. त्यानंतर त्याने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही जामीनअर्ज फेटाळत त्याला सात दिवसांत पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे. नागपुरातून पसार झाल्यानंतर सोंटू हा काही दिवस जयपूरमध्ये वास्तव्यास होता. तो फरार झाल्यानंतर त्याला कोणीकोणी आर्थिक व अन्य मदत केली, याची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. या यादीत सुमारे ५० जणांचा समावेश असून, पोलिसांनी आता त्यांचीही चौकशी सुरू केली आहे. आठ जणांचे बयाणही पोलिसांनी नोंदविले.