मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून ठिकठिकणी समाजबांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन इतके चिघळले की बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ, दगडफेक करण्यात येत असून आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.हे पाहता आरक्षणसंदर्भात तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होईल. शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत, असे सांगितले जात आहे.
दरम्यान मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही.सरकराने बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.