उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एल्विश रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असून तिथे येणाऱ्या लोकांना तो सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटक झाली आहे. तसेच याप्रकरणी एल्विशला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याप्रकरणी एल्विश यादवविरोधात गुन्हे दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. कारण, यंदाच्या गणेशोत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला वर्षा बंगल्यावर येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. त्याने मुख्यमंत्र्यांबरोबर फोटोही काढले होते. एकनाथ शिंदे आणि एल्विशचे फोटो शेअर करत विरोधकांडून टीका करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे, नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातील तरुणांनचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावत आहेत का?” असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एल्विश आणि एकनाथ शिंदेंचा गणेशोत्सवातला फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की, हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्सशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.