नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद इब्राहिम उर्फ मोहम्मद फिरोज शेख (१४, गरीब नवाज नगर) असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी तो मैदानात इतर मुलांसोबत फुटबॉल खेळत होता. खेळताना त्याचे एका मुलाशी भांडण झाले. वाद इतका चिघळला समोरील मुलाने मोहम्मद इब्राहिमच्या मानेजवळ झापड मारली. त्यानतंर तो चक्कर येऊन मैदानातच खाली पडला व बेशुद्ध झाला. त्याला तेथील मुलांनी तातडीने उपचारासाठी मदन रुग्णालयात दाखल केले.
मात्र तेथून त्याला मेयो इस्पितळात पाठविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकाराने त्याचे वडील मोहम्मद फिरोज शेख उर्फ मोहम्मद ईरा (४८) यांच्यासह कुटुंबियांना शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.