नागपूर : शहरात तहसील पोलिसांनी शुक्रवारी पप्पू ऊर्फ परवेज पटेल याच्या घरावर छापा घालून ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोमीनपुऱ्यात छापा घालून ९ पिस्तूल आणि ८४ काडतूस जप्त केली होती.
शहरात पिस्तूलाचा बिनधास्त वापर होत असल्याचे या कारवाई वरून कळते.
तहसील हद्दीतील काही गुन्हेगारांकडे पिस्तूल असल्याची माहिती ठाणेदार विनोद पाटील, निरीक्षक संदीप बुवा यांना मिळाली. यानंतर काही गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होते. पप्पू पटेल हा वादग्रस्त व्यापारी असून त्याच्याकडे दोन पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर कारवाई करत पोलिसांनी पप्पूच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा घातला.
या कारवाईत पोलिसांनी ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले. हे पिस्तूल तौहीर ऊर्फ बबलू अहमद (रायपूर) याने पुरवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या.