नागपूर : चहा पिण्यासाठी शस्त्रक्रिया अर्ध्यातच सोडून जाणाऱ्या सरकारी डॉक्टरने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिलांच्या शस्त्रक्रियेस ऐनवेळी नकार देत रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर त्यांच्यावर कारवाईसह टीकेची झोड उडाली. या सर्व प्रकारावर आपली प्रकृती बरी नसल्याने आपण गेलो, पण काहीच वेळाच परत येऊन आपण शस्त्रक्रिया पूर्ण केल्या असल्याचे लेखी पत्र डॉक्टरने लिहिले आहे. प्रकाराबाबत आपण शस्त्रक्रियेस आलेल्या महिला व त्यांच्या नातेवाईकांची माफी मागतो,असेही त्यांनी पत्रात नमूद केले.
डॉक्टरचे नाव डॉ. तेजराम भलावे असून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी भारती नितेश कानतोडे (रा. पाहुनी), प्रतिमा प्रमोद बारई (रा. ढोलमारा), करिष्मा श्रीधर राजू (रा. खात) आणि सुनिता योगेश झांजोडे या चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली. यादरम्यान वेळेवर चहा न मिळाल्याने डॉ.भलावी हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून रागात बाहेर पडले तर ते पुन्हा परतलेच नाही.
प्रकारावरून संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच राडा घातला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी चौकशीचे आदेश देत तीन सदस्यांची समिती स्थापन केली. भलावे यांनी या समितीपुढे आपला माफीनामा सादर केला आहे. आपल्याला मधुमेह असून रक्तशर्करा कमी झाल्याने आपल्याला वेळेवर चहा व बिस्किटे घ्यावे लागतात. ते वेळेवर मिळाले नसल्याचे अस्वस्थ वाटू लागल्याचे डॉक्टर म्हणाले. आपल्यामुळे संबंधित महिला व त्यांच्या नातेवाईकांना झालेल्या त्रासाबाबत आपण माफी मागत असल्याचे भलावे यांनी आपल्या माफीनाम्यात नमूद केले आहे.
दरम्यान डॉ. तेजराम भलावे यांनी माफीनामा सादर केला तरी त्यांच्यावर कारवाईचा बडगा कायम असल्याचे बोलले जात आहे.