नागपूर : शहरातील महामेट्रोत पात्र नसलेल्यांना अधिकाऱ्यांची पद भरती करण्यात येत आहे. इतकेच नाही तर त्यांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) चौकशीची मागणी व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीत पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत महामेट्रोवर गंभीर आरोप केले आहेत.
महामेट्रोमध्ये नोकरी भरतीमध्ये मागासवर्गीय जातींचे आरक्षण अगोदरच डावलण्यात आले होते. यातच आता अपात्र उमेदवाराला नोकरी पदोन्नती देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
एम.पी. सिंग (एम्लाई नं. ७४३००५०) हे मध्य रेल्वेत कल्याण निरीक्षक येथे कार्यरत होते. त्यावेळेस त्यांची वेतन श्रेणी ९३०० -३४,८०० रुपये अशी होती. त्यांना २०१६ मध्ये प्रतिनियुक्तीवर महामेट्रोत घेण्यात आले. रेल्वेमध्ये त्यांचा ग्रेड ७ होता. एम.पी. सिंग यांनी महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक दीक्षित यांना पत्र लिहिले. त्यानंतर त्यांची प्रतिनियुक्तीवर निवड झाली. २०१६ पासून ते सहायक व्यवस्थापक (एचआर) या पदावर कार्य करीत आहेत. त्यांना ग्रेड ७ पासून सरळ ग्रेड २ वर नियुक्ती देऊन त्यांची वेतन श्रेणी १०००० ते १५२००० प्रमाणे करण्यात आली,असे पवार म्हणाले.
महामेट्रोच्या धोरणानुसार इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना नोकरीमध्ये सामावून घेताना फक्त १ ग्रेडपर्यंत पदोन्नती देता येते. परंतु एम.पी. सिंग यांना ग्रेड ७ वरून थेट ग्रेड २ ची नियुक्ती देण्यात आली. व्यवस्थापक (एचआर) या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता एम.पी. सिंग यांच्याकडे नाही, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसने केला. इतकेच नाही तर एम.पी. सिंग यांनी त्यांच्या नातेवाईकांना मेट्रोत नोकरी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.