नागपूर : सर्व मागासवर्गीयांना आरक्षणाचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात असे नमूद केले. मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली.
छत्तीसगडमध्ये आदिवासी, ओबीसी, एससीमध्येही आरक्षणात वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातही मुस्लिमांच्या मागास जातींना अद्यापही आरक्षण देण्यात आले नाहीत. मात्र काँग्रेस यासाठी प्रयत्नशील आहे.
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा मुद्दा पेटला आहे. सरकारकडून या हे वाद भडकवण्याचे काम सुरु आहे. हा प्रकार थांबवायचा असेल आणि हिंमत असेल तर केंद्र सरकानं तातडीने राष्ट्रीयस्तरावर जातनिहाय जनगणना करावी व त्यानुसार आरक्षण द्यावे.
राज्यात एकापाठोपाठ आरक्षणाचे प्रश्न समोर येत आहेत. धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केलीय. त्यामुळे वातावरण तापत आहे. या परिस्थितीत राष्ट्रीयस्तरावर जातनिहाय जनगणना करणं गरजेचे झाले. केंद्राने ते करावे. भाजपमध्ये दम असेल तर जातनिहाय जनगणना करून मग आरक्षण द्यावं, असे आव्हान पटोले यांनी दिले.