Published On : Thu, Nov 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन 1 डिसेंबरला

श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या शृंखलेत आणखी एक सेवाभावी उपक्रम
Advertisement

नागपूर. श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमातील शृंखलेत आणखी एका सेवाभावी कार्याची भर पडत आहे. राजकीय क्षेत्रातील अग्रणी स्व. गंगाधरराव फडणवीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ नागपुरात गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरच्या निर्मितीसाठी भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे व परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 1 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम नगर, पावनभूमी, वर्धा रोड, सोमलवाडा येथे होत आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी महापौर श्री संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 10 रुपयात जेवण उपलब्ध करून देणारा दीनदयाल थाली प्रकल्प, नागपूर शहर आणि परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांकरिता दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प, दीनदयाल फिरता दवाखाना, कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला आधार देणारा ‘सोबत पालकत्व’ प्रकल्प अशा सेवाभावी प्रकल्पानंतर फाऊंडेशनद्वारे गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात केली जात आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे मार्फत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा अत्यल्प दरामध्ये एमआरआय सेंटर, सीटी स्कॅन सेंटर, एक्स रे, पॅथॉलॉजी त्याचप्रमाणे २५ डायलेसिस मशीनने परिपूर्ण डायलेसिस सेंटर निर्माण करण्याचे निश्चित केले आहे. नागपूर सुधार प्रन्यासने लीजवर दिलेल्या १६ हजार वर्गफुटाच्या प्लॉटवर तीन मजली इमारत उभारण्यात येणार असून इमारतीच्या तळ मजल्यावर पार्किंग, रुग्णांसाठी प्रतीक्षागृह, कार्यालय, ओपीडी कक्ष व पॅथॉलॉजी असेल. पहिल्या मजल्यावर एमआरआय सेंटर असेल यात थ्री टेस्ला अशा अत्त्युच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण दोन एमआरआय मशिन्स, अत्यंत उच्च तंत्रज्ञानाची १२८ स्लाइसची सीटी स्कॅन मशीन, अल्ट्रा साउंड व एक्स-रे मशीन असेल. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर किडनीरोगग्रस्त रुग्णांसाठी २५ डायलेसिस मशीन्सने युक्त असे डायलिसिस सेंटर देखील अत्यल्प दरामध्ये पुरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गंगाधराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये वरील सर्व सेवा या अत्यंत अल्प दरामध्ये पुरविल्या जाणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला निश्चितच होणार आहे.

पत्रकार परिषदेत श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी महापौर श्री संदीप जोशी यांच्यासह उपाध्यक्ष श्री अमोल काळे, सचिव श्री पराग सराफ, सहसचिव ऍड. अक्षय नाईक, कोषाध्यक्ष श्री रितेश गावंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement