नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात धनगर समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान धनगर बांधवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीसांनी २०१३ मध्ये धनगर समाजाला सत्तेत आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यासह देशात भाजपचे सरकार आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आश्वासन पूर्ण करतील, अशी आशा समाजाला होती.
मात्र पूर्ण पाच वर्षे सत्तेत असतानाही मागणी पूर्ण झाली नाही. आता पुन्हा राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा वेठीस धरण्यात आला आहे.आंदोलनादरम्यान ‘क्या हुआ तेरा वादा’ या मजकुरासह उपमुख्यमंत्री फडणीसांच्या फोटोचे फलक झळकवले. धनगर समाजाला एसटी आरक्षण लवकर लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.