नागपूर : शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन काँग्रेसचे हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर धडकला. मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
शेतकरी संकटात सापडला आहे, शेतीमालाला भाव मिळत नाही, सरकार केवळ घोषणा करत आहे, तरुणांना रोजगार मिळत नाही, आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही, ड्रग्ज माफिया खुलेआम कारभार करत आहेत, असे आंदोलक काँग्रेसचे म्हणणे आहे. हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चाही केली नाही, पूर्ण मदतीची पोकळ आश्वासनं दिली जात आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नाही, केंद्रीय गुन्हे नियंत्रण अहवाल ब्युरोने राज्यातील गुन्ह्यांची स्थिती काय आहे हे स्पष्ट केले आहे.
खरिपाचे पीक दुष्काळग्रस्त जाहीर करून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफीच्या बाबतीत यापूर्वी कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत द्यावी, बेरोजगारांना कर्जमाफीचा भत्ता द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या बेड्या नेत्यांनी हल्लाबोल मोर्चादरम्यान केली.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आदी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.