नागपूर : राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा ४ डिसेंबरला दिला आणि ९ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वीकारला. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून आज सभागृहात मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे.
मात्र याचदरम्यान राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. खासदार संजय राऊत यांनी मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का? कुणावर दबाव आहे, कुणाला नाश्ता पाहिजे आहे का ? असा टोला राणे यांनी राऊतांना लगावला. आरक्षणाचा विषय मोठा आहे. या प्रकरणांमध्ये छोटे-मोठे अडथळे येत असतात. कुणाच्याही आरक्षणाला हातही न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, अशी महायुती सरकारची भूमिका असल्याचे राणे म्हणाले.