नागपूर : सोलार ग्रुपच्या आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला. हा मुद्दा आज सोमवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणी सरकारला धारेवर धरले.
कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे स्फोट –
कंपनीतील श्रमिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कंपनीतील कामगांरांना अत्यंत कमी वेतन देण्यात येत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आहे . कामगारांना कामासाठी ‘टार्गेट’देण्यात येते. कामाचे ‘टार्गेट’ पूर्ण झाले नाही तर योग्य मोबदला देण्यात येत नव्हता.
प्रशासनाने वेळीच या सर्व प्रकारांची शहानिशा केली असतील तर नऊ श्रमिकांना कदाचित वाचविता आले असते. कंपनीच्या कामाची निष्पक्ष व नि:पक्ष चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. इतकेच नाही तर कंपनी मालकावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही दोन्ही नेत्यांनी उचलून धरली. राज्य सरकारने मृतांच्या परिवाराला ५ लाखांची मदत जाहीर केली. मात्र ही मदत अत्यंत तोकडी असून मृतांच्या परिवारासाठी ५० लाखांच्या मदतीची मागणी पटोले यांनी केली.
सहा महिन्यांपूर्वीही याच सोलर कंपनीत झाला होता स्फोट –
बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत यापूर्वीही 2018 मध्ये स्फोट झाला होता. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला. 2023 मध्येही सहा महिन्यांपूर्वी स्फोटाची घटना घडली होती. परंतु हे प्रकरण दडपण्यात आले, असा आरोप कंपनीवर करण्यात येत आहे.
दरम्यान नागपूर जिल्ह्यात असलेल्या सोलर कंपनीत औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित स्फोटकं तयार करण्यात येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या अत्यंत जवळ असलेले सत्यनारायण नुवाल हे या कंपनीचे संचालक आहेत. भारतासह तुर्की, झांबिया, नायजेरीया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, घाना, टांझानिया येथेही सोलर कंपनीचा ‘प्रेझेन्स’ आहे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये सोलर कंपनीच्या उत्पादनांचा वापर केला जातो.
इलेक्ट्रॉनिक्स डेटोनेटर्स, थ्री लेअर शॉक ट्यूब, ब्लास्टेक 90, पी-3 आणि पी-5 स्फोटकं कंपनी तयार करते. मात्र बाजारगाव आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांकडून सातत्याने कंपनीवर कामगारांच्या शोषणाचा आरोप होत आहे. रविवारीही घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.