नागपूर : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलतांना मुस्लीम समाजासाठी भीती व्यक्त केली. विधानभवनाच्या पायरीवर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात अबू आझमी आणि रईस शेख यांचा सहभाग होता.
मुस्लीम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी कुणीही करत नाही. आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील, कित्येकांना कारागृहात टाकतील,असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली. या मुद्यावर विशेष अधिवेशन बोलविले जाईल, असेही सांगितले. मात्र, हे करीत असताना मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत त्यांनी तोंडातून शब्दही काढला नाही.
आम्ही वारंवार मागणी करूनही सभागृहात या विषयावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विनंती केली. मात्र याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले, असे आझमी म्हणाले.