नागपूर : शहराच्या बाजारगाव येथील एका मोठ्या सोलर एक्सप्लोझिव कंपनीत भीषण स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करतेवेळी हा स्फोट घडला. याप्रकरणी सरकारने हिवाळी अधिवेशनदरम्यान मोठी घोषणा केली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाणार आहे.
सुरेश खाडे यांनी विधान परिषदेत बोलताना ही माहिती दिली. 16 डिसेंबर रोजी बाजार गावात असलेल्या दारुगोळा निर्मिती सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोट झाला होता. या अपघातात सहा महिला आणि तीन पुरुषांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी करतानाच मृतकांना आर्थिक मदत देण्याची मागणीही केली होती.
बुधवारी याच विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सुरेश खाडे म्हणाले की, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या अंतर्गत सरकारकडून एकूण 5 लाख रुपये आणि 20 लाखाचे अनुदान कंपनीकडून असे एकूण २५ लाखांचे अनुदान देण्यात आले आहे . यासोबतच प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचेही त्यांनी सांगितले.