नागपूर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले. विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचे गडकरी म्हणाले. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे.पवारांनीही कृषिमंत्री असताना या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 125 रुपयाचे नाणे जारी केले. त्या नाण्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला. यावेळी गडकरी यांनी संबोधित केले.
राजकारणाचा अर्थ दुर्देवाने सत्ताकारण असा करण्यात आला आहे. राजकारण म्हणजे राष्ट्राकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे. राजकारण हेच समाजकारण आहे, असे समजून कृषी क्षेत्रासाठी, शिक्षण, सांस्कृतिक कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांसाठी आणि त्यातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार आहेत, असे गडकरी म्हणाले.
देशात शेती प्रगत नव्हती तेव्हा डॉ पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खूप कार्य केले. राजकारणी माणूस हा पाच वर्षांचा विचार करतो पण डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भविष्याचा विचार केला. आपला शेतकरी आता ऊर्जादाता झाला आहे. शेतकरी आता डांबर पण तयार करत असल्याचे विधान गडकरी यांनी केले.