अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये रामलल्लांचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. तत्पूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. यापुढे अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव ‘अयोध्या धाम’ असं असणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्या धाम स्टेशन नाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पुढच्या महिन्यात 22 जानेवारीला रामलल्लांचा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती असणार आहे.
अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या ते दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे.