नागपूर :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांच्यावर टीका केली. भाजपाला कसं रोखायचे हे ठरवा. एकमेकांना चॅलेंज देऊ नका. सगळे समान आहेत. एकदिलाने सगळ्यांना सांभाळून निर्णय घ्यावेत. सगळ्या जागा तुम्ही मागणार मग आम्ही कुठे लढायचे ? असा संतप्त सवाल निरुपम यांनी राऊतांना विचारला.
आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. बहुतेक वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी होईल. त्यामुळे सर्वांनी एकमताने जागावाटपाचा प्रश्न सोडवावा. सगळे एकत्र बसून चर्चा करू आणि ज्या जागा निवडून येतील त्या एकमेकांना वाटप करू. तसेच भाजपाला रोखण्यासाठी एकजूट होऊ.
लोकसभा निवडणुकीचा बिगूल आम्ही आज नागपुरात वाजवणार आहोत. कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे. बेरोजगारी, महागाई कमी करण्यासाठी, सर्वधर्म समभावाने लोकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेस तयार आहे. मुंबई उत्तर पश्चिम जागेबाबत कधीही तडजोड करणार नाही. ही जागा काँग्रेसची आहे. त्याठिकाणी काँग्रेसची ताकद आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांसोबत होणार नसून ती दिल्लीत होईल. आम्ही २३ जागा लढवणार आहोत, हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे, असे संजय राऊत म्हणाले.