नागपूर : राज्याचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. सातत्याने या सरकारकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. यांच्या खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही. देवाजी बापू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाभाऊ खोबरागडे यांच्या काळातही मतभेद होते. मतांतरे होती, मात्र विचार लोकशाहीसाठी होता. स्वातंत्र्य टिकण्यासाठी व स्वातंत्र्यासाठी होता. उपेक्षितांसाठी या सर्वांनी लढाई केली. मात्र, आज यांच्या लेखी दलित, उपेक्षित, बहुजन नाही, तुम्हा आम्हा सर्वांना गुंडाळून मनुवादी विचारांचा देश उभा करण्याचे काम सुरू झाले आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला-
मी देव पाहिलेला नाही, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला. मी इथं पर्यंत पोहचलो, ही त्यांची पुण्याई. जर तुम्ही पुन्हा चूक कराल तर नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मत द्या यासाठी हे बोलत नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.