नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. 22 जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. यापार्श्वभूमीवर देशभरात भाजपकडून जंगी जल्लोष करण्यात येणार आहे. शहरातील चौकाचौकात आतषबाजी करत अक्षरश: दिवाळी साजरी करण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यासंदर्भात माहिती देण्यात आली.
भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीत २२ जानेवारीला कशा प्रकारे जल्लोष करायचा यावर चर्चा झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रत्येक भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत मिळून प्रत्येत चौक व वस्तीत भगवे झेंडे व तोरण लावत वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्वच मोठ्या चौकात जोरदार आतषबाजी करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे सहाही मंडळ व २२ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान संघ व विहिंपतर्फे नागरिकांना घरोघरी जाऊन मंदिर अक्षता वाटप करण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्तेदेखील सर्वसामान्य नागरिकांशी साधणार आहेत. निवडणूकांच्या तोंडावर भाजपसाठी हे महत्त्वाचे ठरेल. या बैठकीला सरचिटणीस राम अंबुलकर, गुड्डू त्रिवेदी, अर्चना डेहनकर, शिवानी वखारे दाणी, संजय पांडे, भोजराज डुंबे, वैशाली चोपडे, चंदन गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.