नागपूर : अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून संपूर्ण देशभरात वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून किमान ५ हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
आमदार -खासदारांकडून मतदारसंघातील ५ हजार नागरिकांना टप्प्याटप्प्याने अयोध्येत नेण्यात येईल. तेथे पक्षाकडून निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात नेणे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली जाईल. याबाबत नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्याच बुक करण्यात येणार आहेत. त्यास ‘रामलला दर्शन विशेष ट्रेन’ असेच नाव देणार आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार-खासदार नाहीत तेथे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक प्रमुख अथवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात येणार आहे.