नागपूर : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. नागपूरसह अनेक भागात सकाळपासून आभाळी वातावरण असून आज, शनिवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.
आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊसही पडला.
एकंदरीत राज्यात पुढील ४८ तासात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. काही राज्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.