Published On : Sat, Jan 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा १३ ते १६ जानेवारी दरम्यान

सहा वयोगटात होणार स्पर्धा : ७,९५,९०० रुपयांची बक्षीसे

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होणा-या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवात यंदा ॲथलेटिक्स स्पर्धांचे विदर्भस्तरीय आयोजन करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा १३ ते १६ जानेवारीदरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सिंथेटिक ट्रॅकवर होणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी तसेच सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी केले आहे.

१३ ते १६ जानेवारी दरम्यान दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत या स्पर्धा चालतील. १२, १४, १६ आणि १८ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटासह खुल्या गटातील पुरुष व महिलांसह ३५ वर्ष वयोगटाचे वरील मास्टर्स पुरुष व महिला खेळाडूसाठी एकूण ११६ विविध क्रीडा प्रकार आणि प्रत्येक वयोगटात ४ रिले शर्यतींचा समावेश राहणार आहे. ४ रिले शर्यतींपैकी मिडले रिले शर्यत, मुला-मुलींच्या गटात स्वतंत्र पणे होईल. तर ४ x १०० मीटर आणि ४ x ४०० मीटर या दोन मिक्स रिले शर्यती १४, १६, १८ व खुला गटासाठी होतील. १२ वर्षाखालील वयोगटासाठी ४ x ५० आणि ४ x १०० मीटर अश्या मिक्स रिले शर्यती होतील. मागील वर्षीपासून पुरुष गटासाठी ५००० मीटर चालणे आणि महिला गटासाठी ३००० मीटर चालणे या चालण्याच्या शर्यतीचा आणि १८ वर्षाखालील वयोगट आणि खुल्या वयोगटाच्या मुला-मुलीसाठी ४०० मीटर अडथड्याच्या शर्यतीचा समावेश करण्यात आला आहे.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्यांना यावर्षी तब्बल ७,९५,९०० रुपयांची बक्षीसे प्रदान केली जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रत्येक वयोगटाच्या स्पर्धकांना सारखी बक्षीस राशी मिळणार आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रथम क्रमांकाला २ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १७०० रुपये व तृतीय क्रमांकाला १५०० रुपये बक्षीस दिले जाईल. याशिवाय रिले शर्यतीमध्ये पहिले, दुसरे व तिसरे स्थान पटकाविणा-या स्पर्धकांना अनुक्रमे, ३ हजार रुपशे २५०० रुपये आणि २ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. प्रत्येक वयोगटाचे स्वतंत्रपणे सांघिक विजेतेपद, उपविजेतेपद आणि तृतीय स्थानासाठी विजेतेपदाचे चषक प्रदान करण्यात येणार आहेत. तर सर्वसाधारण सांघिक विजेतेपदासाठी सुद्धा प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी येणाऱ्या संघाना चषक प्रदान करण्यात येईल. याशिवाय स्पर्धेतील बेस्ट रनर, ब्रेस्ट थ्रोवर, आणि बेस्ट जम्पर ठरणाऱ्या स्पर्धकांना चषक प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेसाठी ११० तांत्रिक पंचाची आणि क्रीडा सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवसभरात विविध शर्यतीचे आयोजन होत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही फोटोफिनिश कॅमेरा आणि यावर्षी एडीएम मशीन आणि एलईडी स्क्रीनवर निकालाची व्यवस्था राहणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवातील अॅथलेटीक्स क्रीडा बाबींचे रेकार्ड ठेवण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षीच्या क्रीडा महोत्सवातील कामगिरी ही बेसधरून हे रेकॉर्ड अपडेट करण्यात आले आहेत. रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या खेळाडूंना त्यांचे मीट रेकॉर्ड ची नोंद करून ठेवण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे प्रवेश हे kkmathletics6@gmail.com या ईमेल वर नोंदविता येणार आहेत. ०८ जानेवारी प्रवेशाची अंतिम तारीख असून ५० रुपये हे प्रवेश शुल्क आहे. रिले शर्यतीसाठी स्वतंत्र शुल्क राहणार नाही. स्पर्धेच्या अधिक माहीतीसाठी रामचंद्र वाणी (९५७९३७४५५४), अशफाक शेख (९४२२१२७८४३) आणि गणेश वाणी (९९२२३५५४९८) यांचेशी संपर्क साधावा. १० जानेवारीला सकाळी १०.०० ते ४.०० यावेळेत खेळाडूंना खासदार समितीचे ऑफिस, ग्लोकल स्क्वेअर बिल्डींग, महाराष्ट्र बँक चौक, बर्डी नागपूर येथे बिब नंबर (चेस्ट नंबर) वितरीत करण्यात येईल. नागपूर ग्रामीणसह विदर्भातील अन्य जिल्ह्यातून सहभागी होणा-या खेळाडूंना व्यवस्था नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणारे खेळाडू, पंच आणि पदाधिकारी अनफरनिश निवास नि:शुल्क भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

Advertisement