नागपूर. नागपूर शहराचा होत असलेल्या चौफेर आणि सर्वांगिण विकासात येथील खेळाडू कुठेही मागे पडणार नाहीत, अशी ग्वाही खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी दिली.
१२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाचे वेळापत्रक असलेल्या ‘पॉकेट सातबारा’चे शनिवारी (ता.६) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विमोचन झाले. सीताबर्डी ग्लोकल मॉल येथील खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार श्री. प्रवीण दटके, भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, श्री. सुधीर दिवे, श्री. जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष श्री. आशीष मुकीम, श्री. प्रकाश चांद्रायण, श्री. नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, नवनीतसिंग तुली आदी प्रामुख्याने उपास्थित होते.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहराचा विकास साधताना आपल्या शहरातील खेळाडूंचाही विकास व्हावा यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी खासदार क्रीडा महोत्सवात काही स्पर्धांचे विदर्भस्तरीय आयोजन होत असल्याचे सांगताना त्यांनी खासदार क्रीडा महोत्सव आज केवळ नागपूर शहराचाच महोत्सव नव्हे तर संपूर्ण विदर्भाचा क्रीडा महोत्सव होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सवातील बक्षिसांच्या रक्कमेत वाढ केली जात आहे. मागील वर्षी खेळाडूंचा दोन लाखांचा विमा काढण्यात आला तो यावर्षी देखील काढण्यात येणार असल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले. खेळाडूंना प्रोत्साहन देणे हेच खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्दिष्ट असून कुठलीही कटूता न ठेवता खेळाचा आनंद घ्या, असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.
महोत्सवाच्या माध्यमातून हजारो खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत असून या यशस्वी आयोजनासाठी ना.श्री. गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी व संपूर्ण समितीचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पीयूष आंबुलकर यांनी केले. १२ जानेवारीला खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ होणार असून २८ जानेवारी २०२४ पर्यंत १७ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शहरातील ६६ क्रीडांगणांवर ५६ खेळ खेळले जातील. यात विविध ५६ खेळांच्या १०५० चमू, ४८०० ऑफिसियल्स, ६५ हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १२५०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना ८९८० मेडल्स आणि ७३५ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी विदर्भ स्तरावर बास्केटबॉल, कबड्डी, कुस्ती, अॅथलेटिक्स आणि खो-खो या पाच खेळांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
संचालन डॉ. पद्माकर चारमोडे यांनी केले तर आभार डॉ. विवेक अवसरे यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील क्रीडा संघटक, प्रशिक्षक, खेळाडू आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
मॅरेथॉन आणि युवा दौडमध्ये मोठ्या संख्येत सहभागी व्हा
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी १२ जानेवारीला होणाऱ्या मॅरेथॉन आणि युवा दौड ला मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन केले. शुक्रवारी १२ जानेवारी रोजी कस्तुरचंद पार्क येथून सकाळी ५ वाजता मॅरेथॉन व युवा दौडला सुरुवात होईल. मॅरेथॉन महिला (५ किमी), पुरुष (१० किमी), १६ वर्षाखालील मुले (५ किमी) आणि मुली (३ किमी) या गटात होणार आहे तर युवा दौड सर्वांसाठी खुली असणार आहे.