नागपूर : शहरात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुटीबोरी वाय पॉइंट येथे एका कंटेनर वाहनातून चार क्विंटल गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून विशाखापट्टणम येथून बिहारला जाणार्या कंटेनरमध्ये हा माल आणण्यात आला होता.
माहितीनुसार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बुटीबोरी वाय पॉइंट येथे एनडीपीएस कायद्यान्वये टाटा कंटेनरची झडती घेतली.गुन्हे शाखेच्या पथकाला कंटेनरच्या आत एका वेगळ्या डब्यात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेला 4 क्विंटल 95 किलो 600 ग्रॅम गांजा सापडला. ज्याची एकूण किंमत 49,56,000 रुपये आहे.पोलिसांनी वाहन चालकासह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे.
पथकाने आरोपींकडून दोन मोबाईल फोन, टाटा कंटेनर वाहन असा एकूण 69 लाख 76 हजार रुपयांचा माल जप्त केला. यासोबतच गांजा पाठवणारा वाहन मालक आणि माल घेणारा आरोपी सुनील हे दोघेही फरार असल्याची माहिती आहे.याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.