नागपूर : मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी झालेल्या पतंगबाजीदरम्यान मांजामुळे नागपुरात ३१ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या विरोधात कारवाई करत १५ जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्याच्या विशेष पथकांनी ठिकठिकाणी छापे टाकून विक्रेत्यांकडून नायलॉन मांजा खरेदी करणाऱ्या तरुणांना अटक केली. पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिन्यात, नायलॉन मांजाच्या विरोधात शहर पोलिसांनी 86 आरोपींविरुद्ध एकूण 68 एफआयआर नोंदवले आहेत. इतकेच नाही तर 86 लाख रुपयांचा प्रतिबंधित मांजा जप्त केला आहे.
विजया नगरमध्ये कळमना पोलिसांनी गुलमोहर नगर येथील ओमेश्वर राम अंबादरे (२०) याला नायलॉन मांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. बेळोणबाग परिसरात जरीपटका पोलिसांनी अखिलेश मदन गोंडाणे (27) याला नायलॉन मांजाच्या दोन रीलांसह ताब्यात घेतले. आशु विलास शेंडे (वय 24, रा. गौतम नगर, मेकोसाबाग) याला नायलॉन मांजा रीलसह पकडण्यात आले. पोलिसांनी अंकुश शंकरराव ठाकरे (वय 27, रा. टेकडी, वाडी) यांच्यासह महेश रामचंद्र नेवारे (37, रा. शाहू ले-आऊट), रोहित आतार रामटेके (19), प्रफुल अशोक गडलिंगे (29, रा. आदर्शनगर, रमाबाई चौक, आंबेडकरनगर) यांना नायलॉन मांजा वापरण्यासंदर्भात अटक केली.