मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवाली सराटी गावातून पायी दिंडी काढणार आहे. त्यांच्या याच आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली. सरकारकडून 20 जानेवारीला सुरु होणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.
आज पुन्हा एकदा सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांच्या भेटीला येत आहे. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. सोबतच, बच्चू कडू देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन ‘ड्राफ्ट’ सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगेकडून सरकारवर गंभीर आरोप –
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी थेट राज्य सरकारवरच आरोप केले आहेत. मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काही मंत्र्यांनाही फूस लावली जात आहे. काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात आहे. मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्या आहेत. माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे, असा गंभीर जरांगे पाटील यांनी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.