नागपूर : सार्वजनिक ठिकाणी शहरात सर्वत्र अवैध होर्डिंग पाहायला मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग आणि बॅनर लागल्याचे चित्र आहे़ यामुळे शहर विद्रूप होत असल्याची तक्रार सातत्याने नागरिकांकडून करण्यात येते. महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने हा प्रकार सुरू आहे. याबाबत नागरिकांचा रोष पाहता मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहे.
शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंग पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना याप्रकरणी संताप व्यक्त केला होता. आर्य यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असून अवैध होर्डिंग हटविण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश देत अवैध होर्डिंग विरोधात कारवाई सुरु केली आहे.