नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे. कुणाल यांनी केलेल्या कृत्यामुळे नागपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
केंद्र कुठलीही योजना ही करदात्याच्या पैशाने राबविली जाते. त्यामुळे ती भारत सरकारची हमी अशी असायला हवी. मात्र असे न होता ती ‘मोदी सरकारची हमी’ अशा नावाने करण्यात आली आहे. यातून पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहेत,असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी आंदोलन करत नागपुरातील जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कुणाल राऊत यांची अटक बेकायदेशीर –
काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष श कुणाल राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे. नागपूरच्या सदर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी, डीसीपी अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार कारवाई करत, नागपूरच्या जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी त्याला अटक केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी U/s अंतर्गत नोटीस जारी केली.
सदर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कथितपणे सत्ताधारी भाजपच्या उच्च अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणी जारी केलेल्या निर्देशाचे अवमान करून कुणाल राऊत यांना अटक करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे.