नागपूर – बुटीबोरी व हिंगणा येथील एमआयडीसीला जोडणारा दुवा म्हणून नवीन रिंग रोड उपयुक्त ठरणार आहे. या मार्गामुळे सर्वसामान्य नागरिकांची सोय तर होणारच आहे, शिवाय उद्योगांच्या माध्यमातून विकासाचा व रोजगाराचा मार्गही प्रशस्त झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले. नागपूर शहरासाठी फोर लेन स्टँड अलोन रिंग रोडच्या जामठा ते फेटरी या पॅकेज-१ चे आज ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आमदार मोहन मते, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अशोक मानकर, अरविंद गजभिये यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. बन्सल पाथ वेजचे श्री. अनिल बंसल यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘रस्ते, पाणी, दळणवळणाची साधने आणि वीज या चार बाबी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळते, गुंतवणूक वाढते, उद्योग येतात आणि रोजगार निर्माण होऊन गरिबी दूर होण्यास मदत होते. हिंगणा आणि बुटीबोरीमध्ये एमआयडीसी आल्यानंतर या भागाचा विकास झाला. आता नवीन रिंगरोडमुळे विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे.’ एअरपोर्ट स्टेशनपासून रिंगरोडच्या सुरुवातीपर्यंत आणि पुढे बुटीबोरीपर्यंत हा रस्ता सहापदरी होणार आहे. तसेच वाडीपासून कोंढाळीपर्यंत देखील सहापदरी रस्त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली. मेट्रोचा विस्तार हिंगणा, बुटीबोरी, कन्हान आणि भंडारा रोडपर्यंत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिंगणा व्हावी ‘स्मार्ट सिटी’
औद्योगिक विकासासोबत स्मार्ट सिटी तयार होणेही गरजेचे आहे. हिंगण्यामध्ये ती क्षमता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. उत्तम शाळा, कॉलेज, उद्याने, मैदाने, आरोग्याच्या सुविधा आदींच्या माध्यमातून हिंगणा ही महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला येऊ शकते, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरचा वाढता व्याप बघता नवीन रिंग रोड लाईफलाइन ठरणार आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला या मार्गामुळे चालना मिळेल. पुढच्या काळात या रिंग रोडमुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था १ लाख कोटींची होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ना. श्री. नितीन गडकरी यांनी केलेल्या कामामुळे देशासोबत विदर्भाचाही चेहरामोहरा बदलला आहे, असेही ते म्हणाले. समृद्धी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत नेऊन कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
असा आहे आऊटर रिंग रोड
या आऊटर रिंग रोडची एकूण लांबी ८४ किलोमीटर आहे. जामठा ते अमरावती रोड, कळमेश्वर रोड, कोराडी रोड, कामठी रोड आणि शेवटी भंडारा पर्यंत हा मार्ग जाणार आहे. त्यापैकी पॅकेज-१ मधील जामठा ते फेटरी हा ३३.५० किलोमीटरचा बायपास आज लोकांच्या सेवेत रुजू झाला. या प्रकल्पाची किंमत ८५६.७४ कोटी एवढी आहे. फेटरीहून पुढे भंडारा येथपर्यंत पॅकेज-२चे काम देखील मार्चच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. रिंग रोडवरील पॅकेज-१ मुळे समृद्धी महामार्गासाठी नागपूर व अमरावती महामार्गाकडून फीडर रुट तयार झाला आहे.
‘बर्ड पार्क’ होणार
जामठा जंक्शनच्या जवळ आठ हेक्टर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कचे काम प्रगतीपथावर असून मार्च अखेरीस ते पूर्ण होईल, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली. या ठिकाणी फक्त पक्ष्यांसाठी आंबा, चिकूसह अनेक फळांची झाडे असतील. सायकल ट्रॅक, कॉफी शॉप, अॉक्सीजन पार्क आदी सुविधा याठिकाणी राहणार आहेत, असेही ते म्हणाले.