नागपूर : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक असलेल्या गणेशपेठ येथे बुधवारी दुपारी एका बसमध्ये बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत बॉक्समध्ये बॉम्ब असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. हा संशयित बॉक्स सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
माहितीनुसार, गडचिरोली येथून (एमएच ४० वाय ५०९७ ) या क्रमांकाची बस १ फेब्रुवारी रोजी नागपुरात आली. त्यानंतर ती मंगळवारी सावनेरला देखील गेली होती.बस मेंटेनन्ससाठी डेपोत आल्यानंतर मेकॅनिकला संशयास्पद बॉक्स दिसला.
त्यानंतर याबाबत गणेशपेठ पोलीस स्टेशनला यासंदर्भात माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकही (बीडीडीएस) याठिकाणी पोहोचले. बीडीडीएसनेबसमधील बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्बमध्ये असणारे काही ज्वलनशील घटक आढळून आले आहेत. त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स तपासणीसाठी नेण्यात आला.
दरम्यान एक तास चाललेल्या कारवाईत बसमधील बॉक्समध्ये असलेली बॉम्बसदृश वस्तू बीडीडीएस पथकाने हस्तगत केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.