नागपूर : शहरातील गणेशपेठ बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये बॉम्ब सदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र वस्तू बॉम्ब नव्हे तर अग्निशमन यंत्र असल्याची माहिती समोर आली आहे. हे यंत्र रेडमॅटिक कंपनीने निर्मित अग्निशामक उपकरण आहे.
दरम्यान गडचिरोलीतून आलेल्या बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती तत्काळ गणेशपेठ पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाला देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेत त्या संशयास्पद वस्तूला सुराबर्डी येथे निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र तपासात अग्निशामक उपकरण असल्याचे समोर आले.
गडचिरोली येथून एमएच 40 वाय 5097 या क्रमांकाची बस एक फेब्रुवारीला गणेश पेठ स्थानकात रात्री होलटींगसाठी आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडीचे काम निघाल्याने ही गाडी गणेश पेठ आगारात उभी होती. दरम्यान ही गाडी सावनेर येथे देखील गेली होती. नंतर ही गाडी आज सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास परत गणेशपेठ बस स्थानकावर आली. दरम्यान एका कर्मचाऱ्याला या बसमध्ये संशयास्पद एक टिफिनच्या आकाराची वस्तु आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.