नागपूर : शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.गोळ्या घालून खून केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केली. घोसाळकर यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित आहे,असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रची स्थिती यूपी, बिहार करून ठेवली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ? शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे. या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असल्याचा अरोप वडेट्टीवार यांनी केला.
राज्यात कायदा -सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होते. सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.
राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. बाहेर काय सुरू आहे याची जाणीव तरी आहे का? गुंडांना राजाश्रय मिळत असेल तर कायद्याचा धाक त्यांच्यावर का राहणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.