मुंबई – मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. अखेर सरकारने शासकीय अध्यादेश काडून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत आरक्षणावर तोडगा काढला. त्यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे.
सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे.मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले.
मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करा, अन्यथा पुन्हा १० फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे. सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवून सगेसोयरे शब्दाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.