मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागांवर निवडणूक लढवली होती. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण १८ लोकसभा मतदार संघापैकी मुंबईत चार लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक समन्वयक नियुक्त केले आहेत.
२७-मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात विलास पोतनीस, २८-मुंबई उत्तर पूर्व(ईशान्य मुंबईत) दत्ता दळवी, ३०-मुंबई-दक्षिण मध्य मध्ये रवींद्र मिर्लेकर तर ३१ -मुंबई-दक्षिण मध्ये सुधीर साळवी व सत्यवान उभे यांची लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) या लोकसभा मतदार संघासाठी माजी महापौर दत्ता दळवी यांची ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती केल्याने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडणार असल्याची माहिती आहे. तर याठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु आहे.
दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत,दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना नेते-माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना उपनेते-युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना ठाकरे संधी देणार असल्याची माहिती आहे.