नागपूर : अखिल भारतीय पोलिस क्रीडा नियंत्रण मंडळाच्यावतीने प्रथमच नागपुरात पोलिसांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ७२व्या अखिल भारतीय पोलिस व्हॉलिबॉल क्लस्टर स्पर्धेला थाटात सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन २९ फेब्रुवारीला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांच्या हस्ते पार पडले.
दोन हजारांहून अधिक पोलीस खेळाडू होणार सहभागी-
या स्पर्धेत पोलिस दलातील १ हजार ४९१ पुरुष, तर ६६३ महिला असे एकूण दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. पोलिस दलातील अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धांमध्ये ३७ राज्यांच्या पोलिस दलासह निमलष्करी दलातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक व इतर जागतिक स्पर्धांचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू यात सहभागी होतील. याअंतर्गत पुरुष व महिलांचे व्हॉलिबॉल, हॅन्डबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, योगा आणि सेपाक टॅकरा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘या’ ठिकाणी होणार स्पर्धा –
स्पर्धेत व्हॉलिबॉलचे पुरुष व महिला गटातील सामने मुख्यालयाच्या पोलिस परेड मैदानावर होतील. तर हॅन्डबॉलच्या स्पर्धा पोलिस मुख्यालयाच्या हॉकी मैदानावर होतील. योगासन स्पर्धा पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे होतील. तर बास्केटबॉलच्या पुरुषांच्या स्पर्धा धरमपेठ येथील शिवाजीनगर जिमखाना, महिलांच्या स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होतील.
टेबल टेनिसच्या स्पर्धा मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलयेथे होतील, तर सेपाक टॅकरा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात होतील. या स्पर्धेचा समारोप २ मार्चला उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता पोलिस मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होईल.