नागपूर :शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हव्यात,अशी मागणीही राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी केलेल्या मागणीमुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मतभेद निर्माण झाल्याही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
छगन भुजबळ म्हणाले, तो आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढंच सागितलं आहे की, महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला हव्यात. शेवटी तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल.
भुजबळांची मागणी व्यक्तीगत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.त्यावरही भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. माझं मत तेच आमच्या पक्षाचं मत आहे. ते काही माझं वैयक्तिक मत नाही. भुजबळ बोलतो तेव्हा पार्टी बोलते. त्यामुळे मुनगंटीवारांनी त्यावर बोलण्याचं कारण नाही, असे भुजबळ म्हणाले.