Published On : Mon, Mar 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सावंगी रुग्णालयात अवयवदानातून प्रथमच लिव्हर ट्रान्सप्लांट

वर्धा – सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात प्रथमच एका गरजू रुग्णावर लिव्हर म्हणजे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यापूर्वी ब्रेन डेड झालेल्या मरणावस्थेतील रुग्णांद्वारे प्राप्त झालेल्या अवयवदानातून १६ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात झाल्या आहेत. मात्र, कॅडेव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांटची या रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून विदर्भात नागपूरबाहेर झालेली ही पहिली शस्त्रक्रिया होय.      

नागपूर येथील व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेला राकेश सातपुते (२४ वर्षे) हा तरूण उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. या अपघातग्रस्त तरुणाला लगेच नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याची अवस्था बघता नातेवाईकांनी नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वैद्यकीय उपचारांसाठी भरती केले. या रुग्णालयात त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रुग्णाचा मेंदू पूर्णपणे मृत झाल्याने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. दि. ११ मार्च रोजी एम्स येथील डाॅक्टरांनी नातेवाईकांना तशी कल्पना दिली. त्यासोबतच राकेशच्या अवयवदानामुळे अन्य गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, याचीही जाणीव कुटुंबातील सदस्यांना करून देण्यात आली.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अखेर नातलगांनी पुढाकार घेत अवयवदानास संमती दिली. एम्सच्या पुढाकाराने आणि क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने अवयवदानातून प्राप्त लिव्हर व एक किडनी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या दोन गरजू रुग्णांकरिता ग्रीन काॅरिडाॅरच्या सहाय्याने पाठविण्यात आली. सावंगी मेघे रुग्णालयात शनिवारी (दि. १६) सायंकाळी ७ ते रात्री २ या दरम्यान झेडटीसीसीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली ५८ वर्षीय पुरूष रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण तर ३७ वर्षीय स्री रुग्णावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईचे डाॅ. रवी मोहनका, डाॅ. प्रशांत राव, डाॅ. विनायक निकम, बधिरीकरण तज्ज्ञ डाॅ. अमेया पंचवाघ, डाॅ. सौरभ कामत, डाॅ. माधवी नायक यांनी पार पाडली. तर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. संजय कोलते, डाॅ. अभिजित ढाले, डाॅ. कपिल सेजपाल, डाॅ. ॠतुराज पेडणेकर यांचा सहभाग होता. याशिवाय, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर, डाॅ. आर.के. शिंदे, डाॅ. संजीव ज्ञानचंदानी, डाॅ. शिवानी क्षीरसागर, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डाॅ. नीता वर्मा, डाॅ. जुही जाधव, सिस्टर मृणाल बम्बोडे, श्वेता, भारती, मेघा, अर्चना सरोदे, हसीम कोलनाडू, मारिया एन्थनी, परिचारक मुरलीधर सातपुते, लक्ष्मण चापतेकर यांचाही या प्रत्यारोपण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहभाग होता.

अवयव प्रत्यारोपणाची ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डाॅ. ललितभूषण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनुप मरार, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक, प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, फरिदा हिरानी, राजेश सव्वालाखे, कर्नल कुलदीप सेहगल, आदित्य भार्गव, अलका बेंजामिन, डाॅ. रणजित, पवन चाफले, प्रज्वल बोंडे, बिपीन मोकल, मंगेश बुधे यांनी विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीन काॅरिडाॅरसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन व पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Advertisement