नागपूर : रामटेक मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे.
जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निश्चय केला होता मात्र आता जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर बर्वे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळी राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा जात पडताळणी समितीने दिला आहे.