मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील झाला. २००४ साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून गोविंदा लोकसभेत दाखल झाला होता. मात्र नंतर ते राजकारणात सक्रिय दिसले नाही.
पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून गोविंदा आणि शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. ठाकरे गटाने यावर शिंदे गट आणि भाजपाला धारेवर धरले.
शिंदे गटाने भाजपाला विचारून गोविंदाचा पक्षप्रवेश करून घेतलाय ना? ज्या गोविंदावर भाजपाने ‘दाऊदची मदत’ घेतल्याचे आरोप केले होते, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारले ना? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला.
गोविंदाने २००४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपा नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्या पराभवनानंतर राम नाईक यांनी म्हटलं होतं की, गोविंदाने त्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतली होती.
राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना २०१६ मध्ये त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं होतं. या आत्मचरित्रात त्यांनी दावा केला आहे की, २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अभिनेता गोविंदा याने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतली होती. नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति..चरैवेति’ या आत्मचरित्रात हा दावा केला होता.