नवी दिल्ली:भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी न्यायपालिकेच्या सार्वभौमत्व आणि स्वायत्ततेवर हल्ला केला जात असल्याचा आरोप देशभरातील तब्बल 600 हून अधिक नामवंत वकिलांनी केला. देशाची न्यायव्यवस्था आणि लोकशाही धोक्यात आहे.राजकीय अजेंड्यातून विशिष्ट गट न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकतो, असा गंभीर आरोप करत 600 हून अधिक नामवंत वकिलांनी थेट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे.
विशिष्ट गटाचे न्यायपालिकेवरील दबावतंत्र वेळीच रोखा आणि त्यांच्या हल्ल्यापासून आमची न्यायालये वाचवा, असेही वकिलांनी या पत्रात नमूद केले आहे.दिग्गज वकिलांच्या या पत्रामुळे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली.
दरम्यान नामवंत वकिलांमध्ये हरीश साळवे, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, गुलाबी आनंद, हितेश जैन, उदय होला आदी ज्येष्ठ वकिलांचा समावेश आहे.
एखाद्या विशिष्ट प्रकरणात न्यायालयाने मनासारखा निकाल दिला नाही की न्यायाधीशांवर टीका केली जाते. जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी करण्याचे हे प्रकार सुरू आहेत.भ्रष्ट नेत्याची पाठराखण करण्यासाठी थेट न्यायालयावर प्रश्न उपस्थित केले जातात, हे अत्यंत चुकीचे आहे. न्यायालयांवर मीडीयाच्या माध्यमातून राजकीय अजेंडय़ातून आरोप करणे हे न्यायव्यवस्था धोक्यात आल्याचेच लक्षण,असेही या वकिलांनी पत्रात म्हटले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही अशाच प्रकारे राजकीय अजेंड्यातून न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले. वडणुकीच्या तोंडावर सुरू होणारे हे उपद्व्याप वेळीच रोखण्यासाठी सरन्यायाधीशांनी कठोर आणि ठोस पावले उचलावीत, आमची न्यायालये विशिष्ट गटाच्या हल्ल्यांपासून वाचवावीत, अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे.