नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याचे समोर आले. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
उन्मेष पाटील आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले. संजय राऊत यांच्याशी उन्मेष पाटील यांनी प्राथमिक चर्चा केली. या चर्चेनंतर उन्मेष पाटील मातोश्रीवर दाखल झाले. यादरम्यान त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.जळगाव मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने उन्मेष पाटील भाजपवर नाराज असून लवकरच ठाकरे गटात सपत्नीक प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या प्रवेशाने जळगावमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढेल. जळगावमध्ये उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
उन्मेष पाटील हे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचे काम चांगले आहे. ते अनेक सहकार चळवळींशी जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे. तरीही त्यांची उमेदवारी कापली आहे त्याचे आम्हाला आश्चर्य वाटले, ते अस्वस्थ आहेत. त्यांनी अगोदर माझ्याशी चर्चा केली. मातोश्रीवर आम्ही गेलो होतो. त्यांनी उध्दव ठाकरेंशी देखील चर्चा केली. ते पक्षात येण्याबाबत उद्यापर्यंत कळेल. तर उन्मेष पाटील आणि त्यांचे सहकारी ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत, असेही राऊत म्हणाले.