नागपूर :हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सैन्यातून निवृत्त झालेल्या व्यक्तीने प्रेयसीसाठी पत्नीचा छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवानंद कृष्णराव काळबांडे (वय ४९, रा. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.चंद्रपुरात जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत आहेत.
माहितीनुसार, त्यांचे २००६ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे. यावेळी ते पत्नीसह उत्तरप्रदेशात कार्यरत होते. दरम्यान २०११ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालयात सिनिअर क्लर्क म्हणून नोकरीवर लागले.यादरम्यान त्यांची एका महिलेशी प्रेमसंबध निर्माण झाले.
याबाबत त्यांच्या पत्नीला माहिती झाले. देवानंद यांनी भांडण करून पत्नीला मारहाण केली. त्यानंतर २२ डिसेंबर २०२३ ला देवानंद यांच्या मोबाईलवर महिलेचे फोटो मुलीला दिसले. तिने ही बाब आईला सांगितली.याबाबतही विचारणा केल्यावर देवानंद कागदपत्रे घेऊन घरातून निघून गेले. इतकेच नाही तर उदरनिर्वाहाकरिता पैसे देणेही बंद केले. त्यामुळे याबाबत मानकापूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर त्यांनी भरोसा सेलकडे प्रकरण पाठविले.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात मानसिक, शारीरिक छळाची तक्रार दिल्यावर मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.