नागपूर: सेंट्रल एव्हेन्यूवरील पोद्दारेश्वर राम मंदिराद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदा शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.शोभायात्रेचे हे ५८वे वर्ष असून यात चित्ताकर्षक चित्ररथांचा समावेश असणार आहे, अशी माहिती पुनित पोद्दार यांनी पत्रपरिषदेत दिली.
शोभायात्रेतील मुख्य रथावरील बॅकग्राउंड हे अयोध्येतील राम मंदिराचे असेल, असे पुनीत पोद्दार म्हणाले.रामनवमीच्या दिवशी म्हणजेच उद्या १७ एप्रिल रोजी मंदिरातून शोभायात्रेला दुपारी ४ वाजता सुरुवात होईल.
शोभायात्रेत १०८ मंगलकलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या कन्या, पौराणिक प्रसंग तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, शहनाई वादक, ढोल-ताशा व ध्वजधारी पथक, गांधीबाग स्केटिंग क्लब आणि लोटस रोलर स्केटिंग क्लबचे स्केटर्स, शंखनाद करणारे पाचशे सदस्य आदींचा समावेश राहील.
दरम्यान या भव्यदिव्य सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची उपस्थिती राहील.