नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली. आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होत आहे.
नागपुरात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५३ टक्के मतदान पार पडले. मात्र, एका मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेदरम्यान साप निघाल्याने खळबळ उडाली. नागपुरातील नंदनवन परिसरातील केडिके कॉलेजमधील मतदान केंद्रावर विषारी साप निघाल्याने मतदारांची धावपळ उडाली.
माहितीनुसार, मोहनिष मोहाडीकर नावाचा तरुण मतदानासाठी रांगेत उभा असताना अचानक त्याला साप दिसला.हा अडीच फूट लांब विषारी साप होता. साप पाहून तिथे उपस्थित मतदारांमध्ये भीती पसरली. मतदान केंद्र क्रमांक ५ च्या पुढे हा साप आढळून आल्याने केंद्रात काही वेळासाठी खळबळ उडाली. यानंतर वाईल्ड लाईफ सोसायटीचे नितेश भांडक्कर यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. रुपचंद वैद्य, लकी खलोडे हे सर्पमित्र याठिकाणी पोहोचल्यानंतर सापाल पकडून जंगलात सोडून दिले. परिसरात साप दिसतात मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.