नागपूर : वर्धा-नागपूर महामार्गावर बुटीबोरी परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. वर्धा येथून नागपूरकडे भरधाव येत असलेल्या कारने रस्त्यालगत उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ६ जण गंभीर आहेत.
अपघाताची ही भीषण घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. राजेश मुरारीलाल श्रीवास्तव (५२) व पूजा राजेश श्रीवास्तव (४५) रा. रामनगर, वर्धा असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर राणी श्रीवास्तव (६३), अमन श्रीवास्तव (२६), संगीता श्रीवास्तव (४८), राकेश श्रीवास्तव (५२) आणि अनिकेत श्रीवास्तव (२२) सर्व रा. रामनगर, वर्धा व चालक सारंग गोल्हर (२६) रा. धामणगाव हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
माहितीनुसार वर्धेतील रामनगर परिसरात राहणारे श्रीवास्तव कुटुंब रविवारी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी नागपूरसाठी निघाले. सगळे एमएच-४०बीई-३१९१ क्रमांकाच्या कारमध्ये होते. चालक सारंग गोल्हर हा कार भरधाव होती.
भरधाव कारने रस्त्यालगत उभ्या एमएच-२९/एके-६१८६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार उलटून गेली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.