नागपूर : गेल्या काही दिवसांपासून अधून-मधून पाऊस पडत असल्याने शहरातील तापमानात कमी-जास्त वाढ होत होती. आता ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्यामुळे नागपूरसह विदर्भात अपेक्षेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढणार आहे.
मंगळवारपासून तापमान वाढून उन्हाचे तीव्र चटके जाणवणार आहेत. तसेच संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे. नागपुरात आज सकाळी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.
मात्र दुपारनंतर सूर्य तापून ऊन वाढले. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. पावसामुळे रविवारी ३७.४ अंशांपर्यंत घसरलेला पारा सोमवारी २.७ अंशांनी चढून ४०.१ अंशांवर गेला.उन्हासोबतच उकाडा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने अनेकांना अस्वस्थ वाटू लागले आहे.
त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे. कडक उन्हामध्ये दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला.