मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी एका प्रचारसभेत बोलताना काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ते धर्मावर आरक्षण देतील, असा आरोप मोदी यांनी केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करत मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. धर्मावर आधारित आरक्षण आम्हाला मान्य नाही,असे पवार कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
धर्मावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. हे कुणीही करणार नाही. जर उद्या मोदींनीही असे आरक्षण देऊ केले तरी आम्ही त्या विरोधात उभे राहू. मोदींचे विधान सामाजिक तणाव आणि कटुता वाढविणारे आहे. या रस्त्याने आपल्याला जायचेच नाही, असे शरद पवार म्हणाले
दरम्यान राजस्थानच्या टोंक येथील सभेत बोलताना काँग्रेसवर घणाघात केला.
काँग्रेसने २००४ केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर आंध्रमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना दिले होते. देशभर त्यांना हे प्रारूप लागू करायचे होते. २००४ ते २०१० या काळात चार वेळा त्यांनी आंध्र प्रदेशात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्यांना हे लागू करता आले नाही, २०११ मध्ये काँग्रेसने हे प्रारूप देशभर लागू करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मोदी म्हणाले.