नागपूर : किरकोळ वादातून प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकराचा चेहरा विद्रूप झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश लक्ष्मण भोयर (२९) असे जखमी प्रियकराचे नाव आहे.
गणेश त्याच्या प्रेयसीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंधांत होता.दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. तरुणीचे काही मित्र येत असल्यामुळे हे गणेशला खटकत होते. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद पेटत होता. २५ एप्रिल रोजी कळमना भाजी मार्केटच्या जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ सायंकाळी पाच वाजता तो उभा असताना त्याच्या ओळखीचे नितीन, अमोल हे दुचाकीवर आले.दुचाकीवर मागे गणेशची प्रेयसीही बसली होती.गणेशच्या चेहऱ्यावर निळ्या रंगाचे द्रव फेकले. यात त्याचा चेहरा, छातीचा भाग जळाला. गणेशने आरडाओरड केल्यावर आरोपी फरार झाले. मात्र त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. कळमना पोलिसांना घटनेसंदर्भात माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस पथकाने त्याला रुग्णालयात दाखल केले. आईच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.