नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली असून विरोधकांना चांगलेच घेरले. तसेच नेत्याच्या मुलाखतीचे सत्रही सुरु झाले. नुकतेच एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणत आहेत की अब की बार तडीपार. पण हरकत नाही, कमीत कमी या कारणांमुळे ते घराबाहेर तर पडले. ड्रॉईंग रुमचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना दाल-आटे का भाव आता त्यांना समजला असेल. महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहीत आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्यादिवशी काँग्रेससह जावं लागेल मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करेन. तरीही उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले आहेत. मला असे वाटते बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारस उद्धव ठाकरे आहेत पण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, आसा टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला हे सगळ्या देशाला माहीत आहे. कारण पहिल्या दिवसापासून हे ठरले होते की भाजपाचा मुख्यमंत्री होईल. सगळ्या प्रचारसभांमध्ये मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही हे सांगत होते की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. उद्धव ठाकरेंनी आमच्या सोबत विश्वासघात केला. आमच्याशी बेईमानी केली आहे. इतके सगळे करुन आम्हाला दोष देणे हा निर्लज्जपणा आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला.